Source: Sakal Kolhapur
नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या चिठ्ठ्या
कोल्हापूर, ता. ३० : ‘बाजार समितीत एकाच पॅनेलमध्ये दोघेजण असणारे आमदार प्रकाश आबिटकर गद्दार की माजी आमदार के. पी. पाटील गद्दार’, असा धडक सवाल एका मतदाराने केला आहे. तर, ‘चंद्रकांतदादा, बाजार समितीत भाजपचे उमेदवार कुठे आहेत?’, ‘कोरे साहेब बड्या धेंडांना बाजार समितीत तिकीट द्या, पदही त्यांना देताय, मग दररोज तुमच्या दारात येणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी काय करायचे?’, ‘बंटीसाहेब, तुमच्या पी.ए. चा एक भाचा साखर कारखान्यात पर्मनंट, दुसरा भाचा कोट्यवधी रुपयांची कामे घेतो, मेव्हणा बँकेत आहे, याला आवर घाला’ अशा पोटतिडकीच्या भावना मतदारांनी मतपत्रिकेसोबत चिठ्ठी लिहून व्यक्त केल्या आहेत. शेती उत्पन्न बाजार समितीची मतमोजणी रमणमळा येथील शासकीय गोडावूनमध्ये झाली. यावेळी मतपेटीतून आलेल्या चिठ्ठ्या नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या आहेत.
चिठ्ठ्यांमध्ये लिहलेला मजकूर असा, ‘सर्व नेत्यांनो, तुमच्या सग्यासोयऱ्यांऐवजी शेतकऱ्यांच्या पोरांना बाजार समितीत नोकरी द्यावी. तुम्ही सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष, बाजार समिती, दूध संघात घरच्यांनाच तिकीट देता. मोठ्या पदासाठी तुम्ही सोयीचे राजकारण करता. कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा.’ एका चिठ्ठीत म्हटले आहे, ‘कोरेसाहेब आपण एक स्वच्छ प्रतिमा असणारे राजकीय व्यक्तिमत्त्व आहात. पण आपली भूमिका प्रत्येक निवडणुकीमध्ये बदलणारी अशी झाली आहे. त्यामुळे तुमच्याबाबत असणारा विश्वास लोकांच्यात राहिलेला नाही. राजाराम कारखान्याला ज्यांच्या सोबत तुम्ही होता त्यांना तुम्हीच आता विरोध करताय. तुमची भूमिका नेमकी कोणती?’ आमदार सतेज पाटील यांना उद्देशून चिठ्ठीत म्हटले आहे, ‘बंटी साहेब आणि ऋतुराज दादा मी तुमचा कार्यकर्ता आहे. मला तुमच्या कामाबद्दल आधार आहे. परंतु, दोन नंबर फळी आहे ती बरोबर नाही. पीए हे सुद्धा बरोबर नाहीत. चहापेक्षा किटली गरम आहे. दक्षिण मतदारसंघातील आपले कारभारी बाबासाहेब चौगुले व शशिकांत खोत यांचा वाढता हस्तक्षेप थांबवा….
अशाही चिठ्ठ्या …
पी. एन. साहेब, करवीर तालुका सोडून काँग्रेससाठी राधानगरी तालुका आहे याचे भान असू द्या.
के. पी. साहेबांवर आहे जनता नाराज, त्यामुळे जनतेला हवा आहे नवा चेहरा, जनतेच्या मनातील आमदार ए. वाय.
– सत्यजित आबा, तुम्ही राजाराम कारखान्यात विरोधी गटाकडून फिरायला नको होते. वारणेने पाठिंबा दिला म्हणून तुम्ही विरोध केला. असे किती दिवस चालणार?
– सर्व खासदार, आमदार तुम्ही सर्वजण सोयीने राजकारण करता आणि कायकर्त्यांची डोकी फुटत्यात. कार्यकर्ता विरोधकांबरोबर दिसला की त्यांचा दोन्ही कडून पट्टा काढता हे बंद करा.
– आमदार प्रकाश आबिटकर आणि माजी आमदार के. पी. पाटील यांनी एकसंघ राहून बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत ही एकत्र यावे.- राधानगरी तालुक्यात काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून अन्याय केला आहे. …
अन्नदात्या शेतकऱ्याचे मनोगत
एका चिठ्ठीमध्ये ‘अन्नदात्या शेतकऱ्याचे मनोगत’ असे म्हणून म्हटले आहे, ‘जनतेचा नेता कसा असावा, जो एका पक्षाशी एकनिष्ठ असावा आणि ज्या आघाडीमध्ये निवडून आला त्या आघाडीमध्ये राहावा. गुवाहाटीला जाणारा नसावा. ईडीचे राजकारण करण्यापेक्षा अन्नदाता शेतकऱ्यांच्या विकासाचीकामे करा. अन्नदात्याची गुऱ्हाळ घरे बंद पडत आहेत. यासाठी उपाय करा. त्याला बांधावर जाऊन पीक वाढीसाठी सल्ला द्यावा आणि त्याला जिवंत ठेवावा. तसेच अन्नदात्याच्या मुलांचे लग्न होत नाही, त्यासाठी उपाय करावा. ही विनंती.’