Source: Sakal Kolhapur
28111लोगो ः ग्राऊंड रिर्पोट
करपा, खोडअळी; पिकांचा जातोय बळीकमी पावसामुळे रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव ः उत्पादनाला बसणार अटकाव
कोल्हापूर ः राज्यात सर्वाधिक पावसाचा जिल्हा म्हणून कोल्हापूरकडे पाहिले जाते. यावर्षी मात्र जुलै महिन्यातील मुसळधार पावसाव्यतिरिक्त जून, ऑगस्टमध्ये अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील भात, भुईमूग, सोयाबीन, नाचणी, उसासह इतर कडधान्यांच्या पिकाला जगवायचे कसे? असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. जिल्ह्यात १ लाख ९२ हजार ६३३ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. यापैकी सुमारे ३० हजारांहून अधिक हेक्टरवरील पीक पावसाअभावी अडचणीत आल्याचे चित्र आहे. तर, कमी पावसामुळे करपा, खोडअळी, पानेखाणारी अळी, उंट अळीसह इतर रोगांचा मोठ्याप्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. -सुनील पाटील
उगवणीची गती झाली कमी जिल्ह्यात जून महिन्यात पावसाला सुरुवात होते. यावर्षी सुमारे वीस ते पंचवीस दिवस उशिरा पाऊस सुरू झाला. त्यामुळे जूनअखेर केवळ १० ते १५ टक्केच पेरण्या झाल्या होत्या. याउलट गेल्यावर्षी जून महिन्याअखेरचे पेरणीचे प्रमाण ६० ते ६५ टक्क्यांपर्यंत होते. १ जुलैनंतर अपेक्षित पावसाला सुरुवात झाली आणि सव्वीस दिवसांतच राधानगरी धरणाचे स्वयंचलित पाच दरवाजे खुले झाले. असाच पाऊस ऑगस्ट महिन्यात राहिल असा शेतकऱ्यांचा अंदाज होता. मात्र, १ ऑगस्टनंतर पावसाने ओढ द्यायला सुरुवात केली आणि जुलै महिन्यात पिकांनी उगवणीने घेतलेली गती हळूहळू कमी झाली. पावसाअभावी अजूनही याला चालना मिळालेली नाही. यातच आता विविध रोगांनी पिकांना घेरल्याने यावर्षी उसासह धान्य आणि कडधान्यांच्या उत्पादनात घट होणार असल्याचा अंदाज शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.
जादाचा खर्च करावा लागणार चक्रेश्र्वरवाडी (ता. राधानगरी) येथील शेतकरी कृष्णात निकम यांनी सांगितले की, जुलै महिन्यात पाऊस झाला. भात पीक उगवणीची चांगली स्थिती होती. ऑगस्टनंतर पावसाने पाठ फिरवली आहे. याचा फटका भात पिकाला बसत आहे. एकीकडे पाण्यामुळे पूर्णक्षमतेने होणारी वाढ थांबली असताना दुसरीकडे भातावर करपा रोग, पाने गुंडाळणारी आळी व खोड अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी महागडी औषधे घ्यावी लागणार आहेत. इतर वर्षाच्या तुलनेत यंदा भात उत्पादनासाठी जादाचा खर्च करावा लागणार आहे. इंगळी (ता. शिरोळ) येथील शेतकरी संदीप गुदले म्हणाले, ‘तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. पिकांची उगवण चांगली झाली आहे. मात्र सध्या पावसाअभावी पिकांची वाढ खुंटणार असल्याचे चित्र आहे. उत्पादनावरही याचा परिणाम दिसू शकतो.
पावसाची ओढ, जीवाला घोरमौजे सांगाव (कागल) येथील प्रगतशील शेतकरी विजय अशोक पाटील म्हणाले, ‘पावसाने ओढ दिल्याने सोयाबीन पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. भुईमूगाला अपेक्षित शेंगांचे प्रमाण नाही. जमीन घट्ट झाल्याने शेंग वाढीवर मोठा परिणाम दिसून येत आहे. ज्या पिकांच्या पानावर अळीचा प्रादुर्भाव आहे. त्यावर औषध फवारणीशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती आहे.’ पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील प्रदीप पाटील म्हणाले, माळरानातील भुईमूग, सोयाबीनला पाणी मिळत नाही. यातच खोड अळी, पाने गुंडाळणारी अळी आणि करपा रोग दिसून येत आहे. त्यामुळे या पिकांना भविष्यात गती मिळण्याबाबत शंका आहे. हे पीक वाया जाईल, अशी स्थिती आहे. एकूणच पावसाने दिलेली ओढ चिंताजनक आहे.