Source: Pudhari Kolhapur
कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांची गुरुवारी बिनविरोध निवड करण्यात आली. आघाडीअंतर्गत ठरल्यानुसार विश्वास पाटील यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. संचालकांच्या बैठकीत डोंगळे यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
सकाळी सर्व संचालक ताराबाई पार्क येथील कार्यालयातून एकत्रितपणे गोकुळ शिरगावच्या प्रधान कार्यालयात आले. डोंगळे यांच्या समर्थकांनी पांढर्या टोप्या घालून सकाळपासूनच गोकुळ शिरगाव येथे गर्दी केली होती. अध्यक्षपदासाठी डोंगळे यांचा एकमेव अर्ज आला. त्यावर मावळते अध्यक्ष विश्वास पाटील सूचक व नविद मुश्रीफ यांनी अनुमोदक म्हणून सही होती. डोंगळे यांचे एकमेव नाव आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी विभागीय उपनिबंधक (दुग्ध) डॉ. महेश कदम यांनी जाहीर केले. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत एकच जल्लोष केला.
अध्यक्ष डोंगळे यांनी वीस लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याबरोबरच जातिवंत जनावरांचे पैदास केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न करावा, पाटील यांच्याप्रमाणे डोंगळे यांनी सर्वांना विश्वासात घ्यावे, अशी अपेक्षा किसन चौगले यांनी व्यक्त केली. अजित नरके यांनी डोंगळे यांच्या कारकिर्दीत ‘गोकुळ’ची उलाढाल 5 हजार कोटींपर्यंत करण्याच्या द़ृष्टीने प्रयत्न करावेत, असे सांगितले. डोंगळे यांच्या अनुभवाचा फायदा होईल, असे रणजितसिंह पाटील म्हणाले. अंबरीशसिंह घाटगे, शशिकांत पाटील-चुयेकर, मुरलीधर जाधव, बाळासाहेब खाडे यांची भाषणे झाली.
यावेळी अभिजित तायशेटे, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, युवराज पाटील, अंजना रेडेकर, कर्यकारी संचालक योगेश गोडबोले आदी उपस्थित होते. निवडीनंतर डोंगळे यांनी राष्ट्रवादीचे नेते आ. हसन मुश्रीफ यांची कागल येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.