Source: Pudhari Kolhapur
कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : शिरोळ तालुक्यातील अकिवाट, सैनिक टाकळी गायरान जमिनीवर औद्योगिक वसाहत होणार आहे. त्यासाठी गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम प्रशासनाने आजपासून (दि. २८) सुरू केली आहे. पहिल्या दिवशी अकिवाट हद्दीतील 100 एकर गायरान शेतीचे क्षेत्र महसूल विभागाने ताब्यात घेतले आहे. बुधवारपासून सैनिक टाकळी येथील जमीन ताब्यात घेण्याची मोहीम सुरू होणार आहे.
दरम्यान या मोहिमेदरम्यान अनुचित प्रकार घडू नये, यासाठी महसूल प्रशासनाने 100 हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त मागविला होता. काही शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाने एप्रिल 2023 पर्यंत अतिक्रमण हटाव मोहिमेला स्थगिती दिल्याचे परिपत्रक दाखवत मोहीम रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, गटविकास अधिकारी शंकर कवितके यांनी जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार आम्ही कामकाज करत आहोत. याबाबत आपण त्यांच्याकडे दाद मागावी. शासकीय कामात अडथळा करू नये, असे सांगत मोहीम सुरू ठेवली.
अकिवाट येथील गट क्र.926 मधील 18 हेक्टर गायरान जमिनीवर 75 शेतकऱ्यांनी शेतीचे अतिक्रमण केले आहे. तर सैनिक टाकळी येथील गट क्र.1350, 1194, 1180 या 15 हेक्टर गायरान जमिनीमध्ये अतिक्रमण आहे. अकिवाट गायरान जमिनीतील 13 शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने 6 हेक्टर शेत जमीन वगळता 12 हेक्टर शेतीचा ताबा घेण्यासाठी तालुका नगर भूमी अधीक्षक कार्यालयामार्फत हद्दी निश्चित करण्यात आल्या आहेत. या हद्दीनुसार महसूल प्रशासनाने आज सकाळी 11 पासून अकिवाट मजरेवाडी रस्त्यावरील विशाल आवटी यांच्या शेतापासून गायरान जमिनीच्या हद्दीत चर मारून जमिनीचा ताबा घेतला. शामराव पाटील, बाळासाहेब किनिंगे, आप्पासाहेब गावडे, शंकर शिंदे, बाळासाहेब पाटील, आण्णासाहेब किनिंगे, बाबासाहेब बेरड, अप्पू किनिंगे, अन्नू किनिंगे, यल्लाप्पा बेरड, बाबाजी बेरड, राजू बेरड, लक्ष्मण बेरड, रावसो बेरड, बाळासाहेब सुंके, तात्यासाहेब सुंके, मनोज सुंके आणि शिरगावे मळ्यापर्यंतची 90 एकर शेत जमीन महसूल प्रशासनाने ताब्यात घेतली. बुधवारपासून सैनिक टाकळी येथील 15 हेक्टर शेत जमीन ताब्यात घेण्याची मोहीम सुरू होणार आहे.
या मोहिमेसाठी तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे- गटविकास अधिकारी शंकर कवितके, तालुका नगर भूमी अधीक्षक प्रियांका मेंडके, ग्रामविकास अधिकारी नंदकुमार निर्मळ, मंडळ अधिकारी चंद्रकांत काळगे, १० ग्रामसेवक, तलाठी यांच्यासह पोलीस निरीक्षक बालाजी भांगे, उपनिरीक्षक अमित पाटील, विजय घाटगे यांच्यासह पोलीस उपस्थित होते.
हेही वाचा