Source: Sakal Kolhapur
देवस्थान इनाम जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर होणार
किसान सभेच्या आंदोलनाला यश
कोल्हापूर, ता. ३ : महाराष्ट्रातील देवस्थान इनाम जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर करण्यासाठी कायदा करणार असल्याचे किसान सभेने काढलेल्या पायी लॉंग मार्चच्या दरम्यान झालेल्या चर्चेवेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. अखिल भारतीय किसान सभेने राज्यातल्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी २६ ते २८ एप्रिल रोजी नगर जिल्ह्यातील अकोले ते लोणी पायी लाँग मार्चचे आयोजन केले होते.
या मोर्चाच्या दरम्यान चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या. मंत्री विखे-पाटील यांनी सरकार इनाम जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाजूने कायदा करणार आहे. यासंबंधीचा मसुदा लवकरच तयार करुन किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांसमोर चर्चा करुन अंतिम करण्यात येईल, असे सांगितले. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांची नावे ७/१२ वरुन कमी केली आहेत, ती पूर्ववत करण्यात येतील. तसेच वारस नोंद करण्याबाबत ही सूचना जिल्हा पातळीवर देण्यात येतील. ज्या देवस्थान जमिनीचे संपादन महामार्गासाठी केले आहे, त्याचा ५० टक्के मोबदला २००६ च्या परिपत्रकानुसार कसणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे, असे निर्णय घेतले. लॉंग मार्चमध्ये कोल्हापूर जिल्हाध्यक्ष डॉ. उदय नारकर, संभाजी मोहिते, अप्पा परीट, लक्ष्मण पाचापुरे, भगवान सुर्यवंशी, राजेंद्र आवळेकर, बाळासो पालखे, एन. वाय. जाधव, अभिजीत कुंभोजे यांच्यासह २०० शेतकरी सहभागी झाले होते.
अखिल भारतीय किसान सभेने मागील १० वर्षापासून देवस्थान इनाम जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सातत्याने संघर्ष केला आहे. १२ एप्रिल रोजी शाहू स्मारक भवन येथे ८०० शेतकऱ्यांचा मेळावा घेतला होता. शासनाने अनेक मागण्या मान्य केल्या असल्या तरीही त्याचा पाठपुरावा करुन प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी तालुका पातळीवर देवस्थान इनाम जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांचे मेळावे घेण्याचे नियोजन किसान सभेने केले आहे. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी किसान सभेच्या जिल्हा समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन किसान सभेच्या जिल्हा समितीने केले आहे.