Source: Sakal Kolhapur
00269
कायदा सल्लागारावरून नगरसेवक आक्रमकआजरा नगरपंचायत मासिक सभा; नाले सफाई, रस्त्यावरील जोरदार चर्चासकाळ वृत्तसेवाआजरा, ता. ३ : आजरा नगरपंचायतीसाठी कायदा सल्लागार नेमण्यावरून नगरसेवकांनी आक्रमक भुमिका घेतली. अधिकाऱ्यांनी सभागृहाला विश्वासात न घेता परस्पर कायदा सल्लागाराची नेमणुक केली. अधिकारी परस्पर निर्णय घेत असतील, तर नगरसेवकांचा काय उपयोग? हा सभागृहाचा अपमान असून कायदा सल्लागार पुर्वी जे होते त्यांनाच ठेवावे, अशी मागणी सभेत करण्यात आली. या वेळी पावसाळ्यापुर्वी नालेसफाई, रस्त्यावरील खड्डे, पिण्याचे पाणी यावर जोरदार चर्चा झाली. नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या. वरिष्ठ कारकून संजय यादव हे मागील सभेचा इतिवृतांत वाचून दाखवतांना कायदेशीर सल्लागार नेमण्याचा विषय सभागृहाच्या पटलासमोर आला. या वेळी ज्येष्ठ नगरसेवक अशोक चराटी यांनी सदरच्या विषयाबाबत सभागृहाला अंधारात ठेवण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केल्याचा आरोप केला. याबाबत सभागृहाला विचारात घेतले नसल्याचे सांगत पुर्वीचे कायदेशीर सल्लागार कायम ठेवावेत, अशी मागणी केली. याबाबत ठराव झाल्याचे सांगितले. याला नगरसेवक विलास नाईक यांनी दुजोरा दिला. प्रशासकीय अधिकारी राकेश चौगुले यांनी कायदेशीर सल्लागार नेमण्यामागची प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. मात्र चराटी यांनी बैठकीत ठराव झाल्याचे सांगितले. मुख्याधिकारी सुरज सुर्वे यांनी कायदेशीर सल्लागार नेमणेबाबत निवेदन केले. पावसाळ्यापुर्वी नाले सफाई करावी, अशी मागणी चराटी यांनी लावून धरली. लेंडओहळच्या नाले सफाईचे काम सुरु असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यास्मिन बुड्डेखान यांनी साई कॉलनीत पावसाळ्यात गटारी तुंबल्याने घरात पाणी जात असल्याचे सांगितले. मासिक बैठकीत वारंवार प्रश्न लावून धरून देखील अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत त्यांनी नाराजी व्यक्त केली. आजरा पेट्रोलपंप, विश्रामगृह अशा अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले असून याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे, असल्याचेही त्यांनी सांगितले. सुमैय्या खेडेकर म्हणाल्या, ‘‘शहरातील एखाद्या प्रभागात पाणी तीन दिवस आले नसले, तर टॅंकरने पाणी पुरवण्याची व्यवस्था नगरपंचायतीने करावी.’’ उपनगराध्यक्षा अस्मिता जाधव यांनी रामतिर्थवरील दुकांनामुळे ये-जा करतांना अडचणी येत असल्याकडे लक्ष वेधले. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, नगरपंचायतीकडील गाड्यावर चालक, कर्मचाऱ्यांचे किमान वेतनचा प्रश्न, दर्गा गल्लीतील भुयारी गटर यासह विविध प्रश्नावर चर्चा झाली. नगरसेवक किरण कांबळे, आनंदा कुंभार, सिकंदर दरवाजकर यांनी चर्चत भाग घेतला. या वेळी विलास नाईक, अनिरुध्द केसरकर, शकुंतला सलामवाडे, संजीवनी सांवत, सीमा पोवार, यासीराबी लमतुरे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ————–चौकटगाळ्यांना सील करण्याचा इशारानगरपंचायतीच्या व्यापारी गाळ्यांचे भाडे थकीत आहे. याकडे नगरसेवक किरण कांबळे यांनी लक्ष वेधले. थकीत भाडे भाडेकरून तातडीने जमा न केल्यास गाळे सील केले जातील, असा इशारा मुख्याधिकारी सुरज सुर्वे यांनी दिला.