Source: Sakal Kolhapur
05055
कागल : शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी करताना कार्यकर्ते.
…
पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन आम्हाला पोरके करू नका
कागल शहरातील कार्यकर्त्यांचे आवाहन कागल, ता. २: ”पवार साहेब, पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन आम्हा कार्यकर्त्यांना पोरके करू नका, ” अशी आर्त हाक कागल शहरातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांना घातली.मुंबईतील कार्यक्रमात श्री. पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे सुतोवाच केल्यानंतर कागलमध्ये ही प्रतिक्रिया उमटली. ‘राज्यासह देशालाही तुमची गरज आहे, राजीनामा मागे घ्या!’ अशी आग्रही मागणीही कार्यकर्त्यांनी श्री. पवार यांच्याकडे केली.जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांच्या नेतृत्वाखाली बस स्टँडजवळच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ एकत्र जमत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही आग्रही मागणी केली. यावेळी श्री. पवार यांच्या समर्थनार्थ घोषणांनी परिसर दणाणून गेला. श्री. पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, या मागणीसाठी पक्षाचे कागल शहराध्यक्ष संजय चितारी यांनीही त्यांच्या पदाचा राजीनामा श्री. माने यांच्याकडे दिला. यावेळी माने म्हणाले, ‘शरद पवार हे गोरगरीब, वंचित, उपेक्षित अशा सामान्य माणसांचा बुलंद आवाज आहेत. सगळ्याच घटकांना न्याय देण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे त्यांनी बहुजन समाजाशी अतूट नाळ निर्माण केली आहे. पवार यांना सोडून महाराष्ट्रासह देशातील राजकारण आणि समाजकारण होणार नाही. राज्यासह देशाला पुढे नेणारी धोरणे त्यांनी राबविली आहेत. अपप्रवृत्तींना रोखण्यासाठी पवार हेच एकमेव रामबाण औषध आहेत.’
याप्रसंगी नितीन दिंडे, विजय काळे, नितीन काळे यांची भाषणे झाली. यावेळी संजय ठाणेकर, शशिकांत नाईक, नवाज मुश्रीफ, तुषार भास्कर, दिपक कांबळे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.