Source: Sakal Kolhapur
01757
स्वतःचा फोटो स्टेटसवर ठेवून कळंब्यात तरुणाची आत्महत्या
कळंबा, ता. ४ ः स्वतःचा फोटो स्टेटसवर ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली वाहून कळंब्यात तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केली. अवधूत अजित डाकवे (वय २४, मुळ रा. डाकवे गल्ली, मंगळवार पेठ, सध्या कळंबा) असे त्याचे नाव आहे. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली. त्याच्यामागे आई आहे.पोलिसांकडून न घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अवधूत आणि त्याची आई सुरेखा हे दोघेच मंगळवार पेठेतील डाकवे गल्लीत राहतात. अवधूतच्या बालपणीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यानंतर आईने कष्टाने त्याला मोठे केले होते. आई एका खासगी दवाखान्यात नोकरी करते. काहीवेळा अवधूतही तिच्यासोबत दवाखान्यात जात होता. काल रात्री ते दोघेही दवाखान्यातून घरी आले. त्यावेळी आई जेवण करण्यासाठी स्वयंपाक घरात गेल्या. त्यावेळी अवधूत दुसऱ्या खोलीत मोबाईल हॅण्डसेट पाहत होता. साधारण अकराच्या सुमारास त्याने स्वतःचा फोटो स्टेटसवर ठेवून भावपूर्ण श्रद्घांजली वाहिली. हा स्टेटस मित्रांनी आणि नातेवाईकांनी पाहिला. त्यानंतर त्यांनी त्याला कॉल केले. पण, अवधूतचा मोबाईल बंद होता. दरम्यान अवधूतने लोखंडी पाईपला टॉवेलने गळफास घेतल्याची माहिती शेजाऱ्यांना मिळाली. त्यांनी गळफास सोडवून अवधूतला सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. एकुलत्या एक मुलाने आत्महत्या केल्याने आईला धक्का बसला. या घटनेमुळे मंगळवार पेठ आणि कळंबा परिसरात शोककळा परसली. त्याचे लग्न ठरविले जात होते. मात्र, अवधूतने घराचे बांधकाम करून नंतर लग्न करूया असे आईला सांगितले. त्यामुळे आई आणि तो कळंबा येथे भाड्याने घर घेवून तेथे राहू लागले. घराचे बांधकाम करून नंतर लग्न करणार असल्यामुळे आई आणि तो दोघेही सुखी आणि आनंदी होते. अशा वेळीच अवधूतने केलेल्या आत्महत्येमुळे हळहळ व्यक्त होत आहे.