Source: Lokmat Sports
MS Dhoni: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन बरेच दिवस झाले आहेत. पण, तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्व करतो. निवृत्तीपूर्वी असो वा निवृत्तीनंतर, धोनी नेहमीच युवा खेळाडूंना मदत करतो. आयपीएलमध्येही धोनी युवा खेळाडूंना खेळण्याची संधी देतो. धोनीने भारताला अनेक टॉप खेळाडू दिले आहेत. आता धोनीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात तो एका युवा खेळाडुला आपल्या बाईकवर लिफ्ट देताना दिसत आहे.
युवा खेळाडूला लिफ्ट दिलीअमेरिका दौऱ्यावरुन परतल्यानंतर धोनी रांचीमध्ये सराव करत होता, तिथे अनेक युवा क्रिकेटपटूही सराव करत होते. सराव संपल्यानंतर धोनीने एका युवा क्रिकेटरला आपल्या बाईकवर लिफ्ट दिली. त्या युवा क्रिकेटरने त्याचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा खेळाडू सराव संपल्यानंतरचे क्षण कॅमेऱ्यात रेकॉर्ड करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. यानंतर तो धोनीसोबत बाईकवर बसून जातो. बाईक चालवताना धोनीने हेलमेट घातलेले दिसत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत गोल्फ काही दिवसांपूर्वीच धोनी अमेरिकेत फिरायला गेला होता. तिथे त्याचे काही व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले. एका व्हिडिओत तो, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत गोल्फ खेळताना दिसत होता. तर, दुसऱ्या व्हिडिओत यूएस ओपनमध्ये प्रेक्षक म्हणून गेल्याचे दिसले. तिसऱ्या एका व्हिडिओत धोनीने चाहत्याला ऑटोग्राफ दिला आणि त्याच्याकडून चॉकलेट मागितले.