Source: Sakal Kolhapur
03974…
लघुउद्योजकांना जागा देण्यासाठी पाठपुरावा करणार
धैर्यशील माने : ‘एकमो’च्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट
कोल्हापूर, ता. २० : ‘लघुउद्योजकांमुळे जिल्ह्यातील फौंड्री उद्योगाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली आहे. मात्र, औद्योगिक वसाहतींमध्ये जागाच शिल्लक नसल्याने ८५ टक्के लघुउद्योजकांना भाड्याच्या जागेत व्यवसाय करावा लागत आहे. त्यामुळे लघुउद्योजकांना एमआयडीसीत जागा मिळावी’, अशी मागणी लघुउद्योजकांच्या इंजिनिअरिंग कंपोनंटस मॅन्यफॅक्चरिंग ओनर्स वेल्फेअर असोसिएशन (एकमो) या संघटनेने खासदार धैर्यशील माने यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.खासदार माने यांनी लघुउद्योजकांना हक्काची जागा मिळवून देण्यासाठी मंत्रालयस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले. विकासवाडी येथे नव्याने होणाऱ्या एमआयडीसीत लघुउद्योजकांसाठी २० हेक्टर जागा देण्याचा शब्द उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिला होता, या जागेबाबत पाठपुरावा करण्याची विनंती ‘एकमो’च्या पदाधिकाऱ्यांनी खासदार माने यांच्याकडे केली. मंत्रालयात पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत लघुउद्योजकांना जागा व संबंधित १३ हेक्टरच्या प्रस्तावाबाबत पाठपुरावा करू, अशी ग्वाही माने यांनी शिष्टमंडळाला दिली. यावेळी ‘एकमो’चे खजिनदार सतीश पाटील, अमित पाटील, राहुल पाटील, सेक्रेटरी नयन गारगोटे, कपिल पाटील उपस्थित होते.