Source: Sakal Kolhapur
उदगाव येथाल प्रादेशिकमनोरुग्णालयासाठी १४६ कोटी
जयसिंगपूर, ता.३: उदगाव (ता.शिरोळ) येथे प्रादेशिक मनोरुग्णालयासाठी १४६ कोटीचा निधी मंजूर झाल्याची माहिती, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली. यासाठी यापूर्वी ११८ कोटींचा प्रस्ताव सादर केला होता. त्याला यापूर्वी मान्यता मिळाली होती. बुधवारी (ता.३) मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ११८ कोटींऐवजी १४६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. रुग्णालयासाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. ११ नोव्हेंबर २०२२ रोजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मंत्रालयातील दालनात झालेल्या बैठकीमध्ये मंत्री सावंत यांनी उदगांव येथे प्रादेशिक मनोरुग्णालय उभारण्यास बैठकीत तत्त्वतः मान्यता दिली होती. २०२२-२३ सादर झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या रुग्णालयासाठी ११८ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने सादर केलेल्या रुग्णालय इमारतीच्या आराखड्यास मान्यता मिळाली आहे.काही दिवसांपूर्वी राज्याचे आरोग्य संचालक डॉ स्वप्निल लाळे यांनी उदगांव येथे येऊन प्रत्यक्ष जागेची पाहणी केली. सोबत उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी काही सूचना दिल्या होत्या. प्रादेशिक आरोग्य संचालकांच्या अहवालानंतर मंत्रिमंडळ बैठकीत रुग्णालयाच्या उभारणीस निधीची तरतूद करण्यात आली. उदगांव येथे होणाऱ्या या शासकीय मनोरुग्णालयाचा लाभ पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांसह अनेक जिल्ह्यांमधील रुग्णांना होणार आहे. राज्यात सध्या ५६९५ रुग्णांसाठी खाटा उपलब्ध असून उदगाव येथे ३६५ खाटांचे रुग्णालय उभे राहणार आहे.