Source: Sakal Kolhapur
इन्कोव्हॅक बूस्टर डोस लसीकरणाचा लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी रेखावार
कोल्हापूर, ता. ४ : जिल्ह्यात कोविड १९ लसीकरण ही नाकावाटे घ्यावयाची इन्कोव्हॅक लस उपलब्ध झाली आहे. हे लसीकरण मोफत करण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व स्तरावर नियोजन करण्यात येत आहे. हे लसीकरण सकाळी ९ सायंकाळी ५ या वेळेत केले जाणार आहे. ६० वर्षांवरील लाभार्थ्यांनी या बूस्टर डोसचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.राज्यात कोविड १९ आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यामध्ये झालेल्या मृत्यूचे विश्लेषण केले असता ६० वर्षांवरील नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले आहे. त्यामुळेच जिल्ह्यात ६० वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. याकरीता सर्व तालुका आरोग्य अधिकारी,वैद्यकीय अधिकारी व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांची जिल्हास्तरावर कार्यशाळा झाली. आरोग्य संस्थात लसीकरण सत्रावेळी कोविड लसीकरणाची व्यवस्था केली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये काही प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय व सामान्य रुग्णालय, सीपीआर हॉस्पिटल येथे लस देण्यात येत आहे. या लशीचे २ डोस प्रत्येक लाभार्थीस नाकावाटे दिले जाणार आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय व सामान्य रुग्णालय आदी ठिकाणी लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असून, जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.