Source: Pudhari Kolhapur
इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा : इचलकरंजीत ‘झिका’चा दुसरा रुग्ण आढळून आल्यामुळे संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने हिवताप, हत्तिरोग, जलजन्य आजार विभागाचे सहसंचालक डॉ. प्रतापसिंह सारणीकर (पुणे) यांच्या पथकाने गुरुवारी (दि. 14) शहरास भेट दिली. महापालिकेत आढावा बैठक घेऊन रुग्णाची विचारपूस केली. तसेच ‘आरसीएच’ केंद्रास भेट देऊन उपाययोजनांबाबत सूचना केल्या.
दरम्यान, ‘झिका’बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 30 जणांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. मात्र, अद्याप त्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही.
शहरात आणखी एकास ‘झिका’ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभाग पुन्हा सतर्क झाला आहे. ‘झिका’ विषाणू गर्भवतींसाठी धोकादायक आहे. आठवडाभरापूर्वी केंद्रीय पथकाने शहराला भेट देऊन पाहणी केली होती, तर गुरुवारी डॉ. सारणीकर यांचे पथक शहरात दाखल झाले. राधाकृष्ण चौक परिसरात आढळलेल्या संशयित रुग्णाची या पथकाने भेट घेतली.
तसेच साथीच्या आजाराबाबतचा आढावा घेण्यात आला. धूर फवारणी, औषध फवारणी, कोरडा दिवस पाळणे, तापाच्या रुग्णांचे सूक्ष्म सर्वेक्षण करणे, गर्भवती मातांची नियमित तपासणी करणे आदी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत सूचना केल्या. यावेळी आयुक्त ओमप्रकाश दिवटे, राज्य कीटक संघटक डॉ. महेंद्र जगताप, जिल्हा हिवताप नियंत्रण अधिकारी डॉ. विनोद मोरे, योगेश साळी, प्रेमचंद कांबळे, डॉ. अमित सोहनी, डॉ. सुनीलदत्त संगेवार, डॉ. दातार, डॉ. बीना रूईकर आदी उपस्थित होते.