Source: Sakal Kolhapur
आश्वासनानंतर महिलेचे उपोषण स्थगितगडहिंग्लज, ता. २ : जमीनीचे क्षेत्र कमी झाल्याने दुरुस्ती करण्यासाठी आणि संबंधित क्षेत्रात बांधकाम, खरेदी विक्री व अन्य बदलाला हरकत अर्ज देवूनही पालिकेने बांधकाम परवाना दिला आहे. हे बांधकाम त्वरीत थांबवावे, या मागणीसाठी शहरातील हौशाबाई मोरे यांनी महाराष्ट्र दिनानापासून बेमुदत उपोषण सुरु केले होते. दरम्यान, दुपारनंतर पालिकेने या प्रश्नी बैठक घेवून त्यावर निर्णय होईपर्यंत बांधकाम थांबवण्याची ग्वाही दिल्याने मोरे यांनी उपोषण स्थगित केले. या प्रश्नावर मोरे यांनी यापूर्वी आत्मदहनाचा इशाराही दिला होता. तेव्हा पोलिसांनी त्यांची भेट घेवून क्षेत्र पूर्ववत करण्यासंदर्भात संबंधित विभागाने सुचवल्याचे सांगून हा इशारा मागे घेण्यास सांगितले. परंतु मुख्याधिकाऱ्यांनी मोरे यांच्या तक्रार अर्जाकडे व पोलिस निरीक्षकांच्या सुचनेकडे दुर्लक्ष करुन वादग्रस्त जागेत बांधकाम परवाना दिला आहे. याबाबत न्यायालयीन दाव्यासाठी आवश्यक कागदपत्रांची मागणी करुनही ती देण्यास टाळाटाळ केली. याद्वारे नगरपालिका अन्याय करीत असल्याची भावना मोरे यांची झाल्याने त्यांनी उपोषण सुरु केले होते.