Source: Sakal Kolhapur
00370——
खूनप्रकरणी वडरगेच्या एकाला जन्मठेपेची शिक्षा
गडहिंग्लज, ता. ३ : कौटुंबिक कारणातून झालेल्या भांडणात भावजयीचा खून केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने श्रावण चन्नाप्पा पोटे (वय ३६, रा. वडरगे, ता. गडहिंग्लज) याला आज जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. दहा हजार दंड आणि दंड न भरल्यास दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षाही सुनावली आहे. जिल्हा न्यायाधीश (क्र. १) ओंकार देशमुख यांनी हा निकाल दिला. सरकारतर्फे अॅड. सुनिल तेली यांनी काम पाहिले.याबाबतची माहिती अशी, १ एप्रिल २०१८ रोजी दुपारी ही घटना घडली होती. आप्पा पोटे व त्याचा पुतण्या श्रावण यांच्यात कौटुंबिक वाद आहे. घटनेदिवशी या वादाच्या कारणावरुन चुलता आप्पा याच्याशी भांडण काढून श्रावण हातात खुरपे घेवून त्याच्या अंगावर धावून गेला. त्यावेळी आप्पाची सून मंगल ही भांडण करु नको असे समजावून सांगत होती. त्यावेळी तुझ्या नवऱ्याला माझ्याबाबत काय सांगितलेस असे म्हणत चिडून श्रावणने मंगल पोटे हिच्या मानेवर खुरप्याने जोराने वार केले. हा वार वर्मी लागल्याने रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाला. तिला उपचारासाठी दवाखान्यात पाठविले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक व्ही. व्ही. हसबनीस यांनी करुन संशयित श्रावण यास अटक केली होती. त्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले होते. न्या. देशमुख यांच्यासमोर त्याची सुनावणी होवून आज निकाल लागला. सरकार पक्षातर्फे अॅड. सुनिल तेली यांनी ९ साक्षीदार तपासले. सबळ पुरावा आणि साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून श्रावणला वरीलप्रमाणे शिक्षा ठोठावली. कोर्ट पैरवी म्हणून पोलिस कॉन्स्टेबल बी. पी. पोवार यांनी काम पाहिले.