Archives

आरोग्याच्या ५७१ जागांसाठी तब्बल ५६ हजार अर्ज

कोल्हापूर शासकीय नोकरीचा प्रश्न किती गंभीर झाला आहे, याचे प्रत्यंतर पुन्हा एकदा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या भरतीच्या निमित्ताने आले आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यातील या विभागाच्या ५७१ जागांसाठी तब्बल ५६ हजार ३४८ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. आज शनिवारी आणि उद्या रविवारी या परीक्षा होणार आहेत. सकाळी १० ते १२ आणि दुपारी ३ ते ५ या वेळेत दोन लेखी पेपर होतील. राज्यातील कोरोनाच्या गंभीर स्थितीमुळे आरोग्य विभागाच्या जागा रिक्त न ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. त्यानुसार कोल्हापूर विभागामध्ये ‘क’ वर्गातील २८४ जागा तर ‘ड’ वर्गातील २८७ जागा भरावयाच्या आहेत. यासाठी लेखी अर्ज मागवण्यात आले आहेत. त्यानुसार ५६ हजार ३४८ जणांनी अर्ज केले आहेत. शनिवारी केवळ ‘क’गटासाठीचे पेपर होणार आहेत. यामध्ये कनिष्ठ लिपिक, अधिपरिचारिका, प्रयोगशाळा वैज्ञानिक, औषध निर्माण अधिकारी, क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी अशा २२ पदांचा समावेश आहे. तर रविवारी केवळ ‘ड’गटासाठी परीक्षा होणार असून यामध्ये शिपाई, प्रयोगशाळा परिचर यासारख्या १२ पदांचा समावेश आहे. अनेक वर्षांनंतर ही भरती होत असल्याने साहजिकच पात्र उमेदवारांनी मोठ्या संख्येने अर्ज केले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक उमेदवार परीक्षेसाठी बसणार आहेत. यामध्ये ‘क’गटासाठी २१ हजार ७८६ तर ‘ड’गटासाठी १० हजार ८१५ उमेदवार परीक्षा देणार आहेत. या दोन दिवसांच्या परीक्षेसाठी कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक ८४, सांगली जिल्ह्यात ४४, रत्नागिरी जिल्ह्यात ३२ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी केवळ ‘ड’ गटासाठीची परीक्षा होणार आहे.Open in app

Comments

mood_bad
  • No comments yet.
  • Add a comment
    • No products in the cart.