Source: Sakal Kolhapur
समस्यांचा बाजार भाग -५
06179इचलकरंजी : नियमित कचरा उठाव होत असल्याने आठवडी बाजारात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.————आठवडी बाजार की कचरा डेपोउठावाकडे महापालिकेचे दूर्लक्ष; स्वच्छता अभियान राबवण्याची गरजऋषीकेश राऊत : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २ : येथील जवाहरनगर पाण्याच्या टाकीजवळ भरणाऱ्या आठवडी बाजारात स्वच्छता करण्यास होत असलेल्या दिरंगाईमुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कचरा उठाव करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने बाजाराची मूळ जागा कचरा डेपोच बनली आहे. परिणामी आता आठवडी बाजार मुख्य रस्त्यावर भरत असून जागा अपुरी पडू लागली आहे. मात्र आठवडी बाजारातून लाखो रुपये उत्पन्न मिळवणाऱ्या महापालिकेस याबाबत सोयरसुतक नाही.अलीकडच्या काळात शहराच्या मुख्य भागाव्यतिरिक्त बाहेरील भाग रहिवासीदृष्ट्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्या-त्या भागांतील रहिवाशांसाठी तेथे आठवडी बाजार भरू लागले आहेत. असाच आठवडी बाजार जवाहरनगर वाढीव भागात स्वामी अपार्टमेंटनजीक पाण्याच्या टाकीजवळ भरतो. प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी हा बाजार भरतो. मात्र हा बाजार त्रासदायक ठरत आहे. संपूर्ण जवाहरनगरसह स्वामी अपार्टमेंट, इंदिरा गांधी हौसिंग सोसायटी, कबनूर आदी भागातील नागरिक या बाजारात येतात. बाजारात एक हजाराहून अधिक विक्रेते असतात. ते नागरिकांना ताजी भाजी तर पुरवतात; मात्र बाजार उठताच तेथे होणारा कचरा न बघवणारा व तेवढाच दुर्गंधीयुक्त असतो. बाजाराच्या ठिकाणी कचरा मोठ्या प्रमाणात साचला असून कचरा फेकण्यासाठी या जागेचा वापर होऊ लागला आहे.प्रती विक्रेते रक्कम आकारून लाखो रुपये उत्पन्न मिळवले जाते. मात्र, त्या ठिकाणची साफसफाई करण्यास महापालिकेचा आरोग्य विभाग टाळाटाळ करत आहे. कट्टे बांधण्यात आलेल्या बाजार संकुलात कचऱ्यांचे ढीगच्या ढीग आहेत. घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून या साम्राज्यातच नागरिकांना बाजारहाट करावा लागत आहे. कचऱ्याचा अनधिकृत डेपो आणि मोकाट जनावरांचाही सुळसुळाट निर्माण झाला आहे. याकडे लक्ष देऊन स्वच्छता अभियान राबवणे आवश्यक आहे. कचरा डेपोसारखी अवस्था झाल्याने बाजारात कोणी विक्रेता बसण्यास तयार नाही. त्यामुळे आता बाजार रस्त्यावर भरू लागला असून वाहतुकीच्या समस्या निर्माण होत आहेत. (समाप्त)———प्रशस्त जागेची मागणीसुरुवातीला पाण्याच्या टाकीजवळ भरणाऱ्या आठवडी बाजारासाठी सुसज्ज कट्टे बांधून जागा उपलब्ध करून दिली. या जागेचा कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. शिवाय विक्रेत्यांची संख्या तिपटीने वाढली आहे. यामुळे बाजार मुख्य रस्त्यावरच भरू लागला आहे. नागरी समस्या उद्भवू नये यासाठी या बाजारालगतच प्रशस्त जागेची मागणी महापालिकेकडे केली आहे.—-बाजारात घाणीचा त्रास सहन करावा लागत आहे. याचा प्रादूर्भाव इतका वाढला आहे की ही जागा बाजारासाठी लायक नाही. महापालिकेने आता विक्रेत्यांसाठी सुरक्षित जागा उपलबध करून द्यावी.-चंद्रकांत लाटणे, विक्रेते————————-शहरातील आठवडी बाजारांच्या ठिकाणी स्वच्छतेचा ठेका दिला होता. त्याची मुदत संपली आहे. त्यासाठी चौदाव्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध होत होता. आता निधी नसल्यामुळे उपलब्ध यंत्रणेतूनच स्वच्छता केली जात आहे. त्यामध्ये काही त्रुटी राहत असतील तर त्या दूर केल्या जातील. अशा ठिकाणी स्वच्छता ठेवण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील.-डॉ. सुनिलदत्त संगेवार, आरोग्य अधिकारी, इचलकरंजी महापालिका