Archives

‘अमूल’ला मदत करण्यासाठी ‘गोकुळ’ वाढवला नाही

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’चे दूध व दुग्धजन्य पदार्थांसाठी मुंबई हेच मार्केट असून त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. कोण काय म्हणते यापेक्षा शेतकऱ्यांना दोन रुपये जादा दर देण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. मागील दाराने ‘अमूल’ला मदत करायची असेल म्हणूनच आतापर्यंत मुंबईत ‘गोकुळ’ वाढू दिला नाही, असा आरोप पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला. ‘गोकुळ’च्या शुक्रवारी झालेल्या ऑनलाईन सभेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मंत्री पाटील म्हणाले, कोविडच्या नियमामुळे सभा ऑनलाई घ्यावी लागली. नाही तर आम्हाला शेतकऱ्यांमध्ये जाऊन सभा घेणे आवडले असते. शेतकऱ्यांना दोन रुपये जादा देण्याचा क्रांतिकारी निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. यापुढे ही दूध संकलन वाढीबरोबरच मार्केटिंगकडे अधिक लक्ष दिले जाईल. मुंबईतील जागांसह इतर बाबतीत केलेल्या आरोपाबाबत अध्यक्ष विश्वास पाटील, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, संचालक अरुण डोंगळे यांनी सविस्तर सांगितले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यामुळे मुंबईत महामार्गाला लागून जागा मिळाली. मुंबईतील मार्केट वाढवण्यासाठी ही जागा आमच्यासाठी महत्त्वाची हाेती. पूर्वी राजकीय व्देषातून वासाचे दूध काढले जायचे, आता हे बंद झाल्याचेही मंत्री पाटील यांनी सांगितले. सोमय्यांनी दौरा टाळावाराज्य सरकार अस्थिर करण्यासाठी किरीट सोमय्या यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात शांतता आहे. सोमय्यांनी दौरा करून वातावरण बिघडवू नये. त्यांनी कोल्हापूरचा दौरा टाळावा, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.Open in app

Comments

mood_bad
  • No comments yet.
  • Add a comment
    • No products in the cart.