Source: Sakal Kolhapur
शेतकरी संघ इमारतीसमोरील शेडवरील कारवाई थांबविली–तीन दिवसांत शेड स्वतः काढून घेण्याचे व्यावसायिकांनी केले कबूल
कोल्हापूर, ता. ३ ः भवानी मंडप परिसरातील शेतकरी संघाच्या इमारतीसमोरील सहा शेडचे अतिक्रमण हटवण्याचा आज महापालिकेने प्रयत्न केला. त्यासाठी दुपारी गेलेल्या जेसीबीसमोर व्यावसायिक आडवे पडले. बांधकाम परवानगी नसल्याने तसेच हेरिटेज वास्तू बाधित होत असल्याने कारवाई होणारच असे महापालिकेने सांगितल्याने तीन दिवसांत शेड स्वतः काढून घेतो असे सांगितल्याने कारवाई थांबवण्यात आली.शेतकरी संघाच्या इमारतीसमोरील जागेत विविध व्यवसायांचे सहा शेड उभी केली आहेत. त्याबाबत आलेल्या तक्रारीनुसार जून २०२२ मध्ये संबंधितांना नोटीस दिल्या होत्या. त्यानंतर कारवाई झाली नव्हती. त्याबाबत पुन्हा तक्रार अर्ज आल्याने नगररचना विभागाचे अधिकारी आज कारवाई करण्यासाठी कर्मचारी तसेच जेसीबी घेऊन दुपारी भवानी मंडपात गेले. उपशहर रचनाकार रमेश मस्कर, महादेव फुलारी उपस्थित होते. त्यांनी शेडधारकांकडे बांधकाम परवानगी नसल्याने कारवाई केली जाणार असे सांगितले. तिथे आणलेल्या जेसीबीसमोर तेथील व्यावसायिक आडवे पडले. त्यावेळी अधिकाऱ्यांनी कारवाई होणार अशी कडक भूमिका घेतल्याने शेवटी व्यावसायिकांनी चर्चा करत तीन दिवसांची मुदत मागून घेतली. या कालावधीत अतिक्रमण स्वतःहून काढून घेतले जाईल, असे व्यावसायिकांनी कबूल केल्याचे अभियंता फुलारी यांनी सांगितले.